श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी, Shri Swami Samarth Charitra Saramrut Marathi, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी अध्याय 8, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण मराठी, अक्कलकोट मंदिरात गेल्यावर आपण वटवृक्ष मंदिर किंवा समाधी मंदिर येथे बसून मनोभावे श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे पारायण करावे. आपण ३ अध्याय , ७ अध्याय, संपूर्ण २१ अध्याय असे पारायण करू शकता. २१ अध्यायाचे पारायण केल्यास अतिउत्तम! संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करण्यासाठी साधारण २ तास एवढा कालावधी लागतो. आपल्याकडे पोथी असेल तर जाताना सोबत आपली पोथी घेऊन जावी. ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांना मंदिर परिसरातील स्टॉल वरती सहज उपलब्ध होऊ शकेल.
। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी सुखधामा । जयजयाजी परब्रह्मा । जयजय भक्तजन विश्रामा । अनंतवेषा अनंता ॥१॥
तुझ्याच कृपे करोन । अल्प वर्णिले स्वामीचरित्र । पुढे कथा सुरस अत्यंत । वदविता तूं दयाळ ॥२॥ मागील अध्यायाचे अंती । विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांप्रती । चमत्कार दाविती यती । ते चरित्र वर्णिले ॥३॥ अक्कलकोटी वास केला । जन लाविले भजनाला । आनंद होतसे सकला । वैकुंठासम नगरी ते ॥४॥
राजे निजाम सरकार । त्यांचे पदरी दप्तरदार । राजे रायबहाद्दूर । शंकरराव नामक ॥५॥
सहा लक्षांची जहागीर त्याप्रती । सकल सुखे अनुकूल असती । विपुल संपत्ती संतती । काही कमती असेना ॥६॥
परी पूर्वकर्म अगाध । तया लागला ब्रह्मसमंध । उपाय केले नानाविध । परी बाधा न सोडी ॥७॥
समंध बाधा म्हणोन । चैन न पडे रात्रंदिन । गेले शरीर सुकोन । गोड न लागे अन्नपाणी ॥८॥
नावडे भोगविलास । सुखोपभोग कैचा त्यास । निद्रा न येचि रात्रंदिवस । चिंतानले पोळले ॥९॥
केली कित्येक अनुष्ठाने । तशीच ब्राह्मण संतर्पणे । बहुसाल दिधली दाने । आरोग्य व्हावे म्हणोनी ॥१०॥
विटले संसारसौख्यासी । त्रासले या भवयात्रेसी । कृष्णवर्ण आला शरीरासी । रात्रंदिन चैन नसे ॥११॥
विधीने लेख भाली लिहिला । तो न चुके कवणाला । तदनुसार प्राणिमात्राला । भोगणे प्राप्त असे की ॥१२॥
कोणालागी जावे शरण । मजवरी कृपा करील कोण । सोडवील व्याधीपासोन । ऐसा कोण समर्थ ॥१३॥
मग केला एक विचार । प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर । तेथे जाऊनि अहोरात्र । दत्तसेवा करावी ॥१४॥ ऐसा विचार करोनी । तात्काळ आले त्या स्थानी । स्वतः बैसले अनुष्ठानी । व्याधी दूर व्हावया ॥१५॥
सेवा केली बहुवस । ऐसे लोटले तीन मास । एके रात्री तयास । स्वप्नी दृष्टांत जाहला ॥१६॥
अक्कलकोटी जावे तुवा । तेथे करावी स्वामीसेवा । यतिवचनी भाव धरावा । तेणे व्याधी जाय दूरी ॥१७॥ शंकररावांची भक्ती । स्वामीचरणी काही नव्हती । म्हणोनी दृष्टांतावरती । गाणगापूर न सोडिले ॥१८॥
ते तेथेचि राहिले । आणखी अनुष्ठान आरंभिले । पुन्हा तयांसी स्वप्नी पडले । अक्कलकोटी जावे तुवा ॥१९॥
हे जाणोनि हितगोष्टी । मानसी विचारुनि शेवटी । त्वरित आले अक्कलकोटी । प्रियपत्नीसहित ॥२०॥
अक्कलकोट नगरात । शंकरराव प्रवेशत । तो देखिल जन समस्त । प्रेमळ भक्त स्वामींचे ॥२१॥
स्वामीनाम वदती वाचे । कीर्तन स्वामीचरित्रांचे । पूजन स्वामीचरणांचे । आराध्यदैवत स्वामीच ॥२२॥
तया नगरीच्या नरनारी । कामधंदा करिता घरी । स्वामीचरित्र परस्परी । प्रेमभावे सांगती ॥२३॥
कित्येक प्रातःस्नाने करोनी । पूजाद्रव्य घेवोनी । अर्पावया समर्थचरणी । जाती अति त्वरेने ॥२४॥
महाराष्ट्र भाषा उद्यान । पद्मकुसुमे निवडोन । शंकर विष्णु दोघेजण । स्वामीचरण पुजिती ॥२५॥
इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । अष्टमोध्याय गोड हा ॥२६॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी अध्याय 9
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी Youtube Video
हेही वाचा
==> श्री स्वामी समर्थ तारक मंत्र