श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी, Shri Swami Samarth Charitra Saramrut Marathi, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी अध्याय 9, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण मराठी, अक्कलकोट मंदिरात गेल्यावर आपण वटवृक्ष मंदिर किंवा समाधी मंदिर येथे बसून मनोभावे श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे पारायण करावे. आपण ३ अध्याय , ७ अध्याय, संपूर्ण २१ अध्याय असे पारायण करू शकता. २१ अध्यायाचे पारायण केल्यास अतिउत्तम! संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करण्यासाठी साधारण २ तास एवढा कालावधी लागतो. आपल्याकडे पोथी असेल तर जाताना सोबत आपली पोथी घेऊन जावी. ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांना मंदिर परिसरातील स्टॉल वरती सहज उपलब्ध होऊ शकेल.
। श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण-भोजने । स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥
दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी यवन भाविक । दर्शना येती धावोनी ॥३॥
यात्रेची गर्दी भारी । सदा आनंदमय नगरी । साधु संत ब्रह्मचारी । फकीर संन्यासी येती पै ॥४॥
किती वर्णावे महिमान । जेथे अवतरले परब्रह्म । ते नगरी वैकुंठधाम । प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥
असो ऐशा नगरात । शंकरराव प्रवेशत । आनंदमय झाले चित्त । समाधान वाटले ॥६॥
यात्रेची झाली दाटी । कैशी होईल स्वामीभेटी । ही चिंता उपजली चित्ती । मग उपाय योजिला ॥७॥
जे होते स्वामीसेवक । त्यात सुंदराबाई मुख्य । स्वामीसेवा सकळिक । तिच्या हस्ते होतसे ॥८॥
तियेची घेऊनी गाठी । शंकरराव सांगती गोष्टी । करोनी द्याल स्वामीभेटी । तरी उपकार होतील ॥९॥
व्याधी दूर करावी म्हणोनी । विनंती कराल स्वामीचरणी । तरी आपणा लागोनी । द्रव्य काही देईन ॥१०॥
बाईसी द्रव्यलोभ पूर्ण । आनंदले तियेचे मन । म्हणे मी इतुके करीन । दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥
ते म्हणती बाईसी । इतुके कार्य जरी करिसी । तरी दहा सहस्त्र रुपयांसी । देईन सत्य वचन हे ॥१२॥
बाई विस्मित झाली अंतरी । ती म्हणे हे सत्य जरी । तरी उदक घेऊनी करी । संकल्प आपण सोडावा ॥१३॥
शंकरराव तैसे करिती । बाई आनंदली चित्ती । म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती । कार्य आपुले करीन ॥१४॥
मग एके दिवशी यती । बैसले होते आनंदवृत्ति । शंकरराव दर्शन घेती । भाव चित्ती विशेष ॥१५॥
बाई स्वामींसी बोले वचन । हे गृहस्थ थोर कुलीन । परी पूर्वेकर्मे यालागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥१६॥
तरी आता कृपा करोनी । मुक्त करावे व्याधीपासोनी । ऐसे ऐकता वरदानी । समर्थ तेथोनी उठले ॥१७॥ चालले गावाबाहेरी । आले शेखनुराचे दर्ग्यावरी । शंकररावही बरोबरी । त्या स्थळी पातले ॥१८॥
यवनस्मशानभूमीत । आले यतिराज त्वरीत । एका नूतन खाचेत । निजले छाटी टाकोनी ॥१९॥
सेवेकरी शंकररावासी । म्हणती लीला करून ऐसी । चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥
काही वेळ गेल्यावरी । उठली समर्थांची स्वारी । शेखनुराचे दर्ग्यावरी । येउनी पुढे चालले ॥२१॥
शंकररावे तया दिवशी । खाना दिधला फकिरांसी । आणि शेखनुरासी दर्ग्यासी । एक कफनी चढविली ॥२२॥
मग काही दिवस लोटत । स्वामीराज आज्ञापित । बारीक वाटूनी निंबपत्र । दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥
ते घ्यावे हो औषध । तेणे जाईल ब्रह्मसमंध । जाहला स्वामीराज वैद्य । व्याधी पळे आपणची ॥२४॥
स्वामीवचनी धरुनी भाव । औषध घेती शंकरराव । तयासी आला अनुभव । दहा दिवस लोटले ॥२५॥
प्रकृतीसी आराम पडला । राव गेले स्वनगराला । काही मास लोटता तयाला । ब्रह्मसमंधे सोडिले ॥२६॥
मग पुन्हा आनंदेसी । दर्शना आले अक्कलकोटासी । घेउनी स्वामीदर्शनासी । आनंदित जाहले ॥२७॥
म्हणती व्याधी गेल्यानंतर । रुपये देईन दहा सहस्त्र । ऐसा केला निर्धार । त्याचे काय करावे ॥२८॥
महाराज आज्ञापिती । गावाबाहेर आहे मारुती । तेथे चुनेगच्ची निश्चिती । मठ तुम्ही बांधावा ॥२९॥
ऐशिया एकांत स्थानी । राहणार नाही कोणी । ऐसी विनंती स्वामीचरणी । कारभारी करिताती ॥३०॥
परि पुन्हा आज्ञा झाली । मठ बांधावा त्याच स्थळी । भुजंगादिक मंडळी । दाखविली जागा तयांनी ॥३१॥ सर्वानुमते तेथेचि । मठ बांधिला चुनेगच्ची । किर्ती शंकररावाची । अजरामर राहिली ॥३२॥
अगाध स्वामीचरित्र । तयाचा न लागेची पार । परी गंगोदक पवित्र । अल्प सेविता दोष जाती ॥३३॥
श्रवणी धरावा आदर । तेणे साधती इहपरत्र । जे झाले स्वामीकिंकर । विष्णू शंकर वंदिती त्या ॥३४॥
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी अध्याय 10
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मराठी Youtube Video
हेही वाचा
==> श्री स्वामी समर्थ तारक मंत्र