श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ संपूर्ण माहिती Akkalkot Swami Samarth Information

//

Swami Samarth

Akkalkot Swami Samarth Information: श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट तीर्थ क्षेत्राची संपूर्ण माहिती. सदरील माहितीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ महाराज आणि अक्कलकोटचा इतिहास. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पवित्र वास्तु आणि मंदिरे. अक्कलकोट मधील मंदिरात करावयाची सेवा, प्रार्थना आणि उपासना. अक्कलकोट येथील अन्नछत्र, भक्तनिवास माहिती आणि बरेच काही. चला तर मग सुरवात करूया.

अक्कलकोट पार्श्वभूमी Akkalkot Swami Samarth Information

अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते. स्वामी समर्थ महाराजांनी इ.स 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्षे येथे वास्तव्य केले. इ.स 1878 मध्ये मध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासवून लौकिक दृष्ट्या देह संपवला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे आहे. ह्याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे ब्रीदवाक्य “हम गया नही जिंदा है” याची प्रचिती माझ्यासहीत अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेल व रोज अनेकजण घेतात. त्यामुळेच दरोरोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जातात.

श्री स्वामी समर्थ महाराज पार्श्वभूमी

इ.स 1149 मध्ये छेली खेडे पंजाब येथे प्रगट होऊन भगवान श्री दत्त महाराजांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इ.स 1378 मध्ये पिठापूर (आंध्रप्रदेश) येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इ.स 1528 मध्ये कारंजा येथून श्री नृसिंहसरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. इ.स 1678 मध्ये नृसिंहसरस्वती या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इ.स 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे वास्तव्य केले.

श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये वर्णीत स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आपला परिचय

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2 मध्ये हा संदर्भ येतो, ज्या वेळी महाराजांच्या दर्शनासाठी कलकत्त्याचा कोणीतरी साहेब आला होता त्याने स्वामींना प्रश्न केला,आपण आला कोठुनी? ह्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आपला परिचय खालील प्रमाणे,

तर असा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड प्रवास. आता आपण जाणून घेऊयात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेली मंदिरे आणि वास्तू.

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान,अक्कलकोट Shree Vatavriksha Swami Samarth Maharaj Mandir

श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे एकूण 22 वर्षे वास्तव्य केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य ह्या वटवृक्षाखाली होते. वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या. आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले.भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतामुक्तीची हमी दिली. आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची साक्ष देत दिमाखात उभा आहे. वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून, साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज ह्या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना, दुःख स्वामींसमोर व्यक्त करावीत.ह्याचे कारण असे आहे, अक्कलकोट मधील 22 वर्षांच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या, दुःख निवारण स्वामी महाराजांनी ह्या वटवृक्षाखाली बसूनच केलेले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्या मुळे ह्या वटवृक्षाचे महत्व फार मोठे आहे. Akkalkot Swami Samarth Information

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मुख्य मंदिर

वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे. मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे. येथे अध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती येते.

Akkalkot Swami Samarth Information
श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर

बाजूला स्वामींचे शेजघर असून येथे एक स्वामींचा पलंग देखील आहे. तसेच अनेक स्वामींचा वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत. त्याचे देखील न विसरता दर्शन घ्यावे. मुख्य मंदिराच्या समोर ज्योतिबा मंडप आहे. येथे अध्यात्मिक कार्यक्रम, पारायण आणि प्रवचने होतात.

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर। आरतीच्या वेळा

5.00 AMकाकड आरती
5:30 AM to 7:00 AMपूजा
7:15 AM to 11 AMभक्तांचे अभिषेक
11:30 AMनैवेद्य-आरती
1:00 PM to 4:00PMगाभारा बंद होतो
4:00PMगाभारा उघडतो
7:45 PM to 9:00 PMशेज आरती
10:00 PMगाभारा बंद होतो
Akkalkot Temple Timing

श्री खंडोबा मंदिर ( श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान) | Shri Khandoba Mandir ( Shri Swami Samarth Aagman Sthan)

अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथमतः आगमन श्री खंडोबा मंदिर येथे झाले होते. येथे श्री स्वामी समर्थांनी पहिले तीन दिवस वास्तव्य केल्याने त्यास महत्त्वाचे स्थान मानले जाते.

Akkalkot Swami Samarth Information
श्री खंडोबा मंदिर, अक्कलकोट

श्री खंडोबा मंदिर इतिहास Akkalkot Swami Samarth Information

सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी कै. सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब ह्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या अक्कलकोट संस्थानच्या अधिपती होत्या. राणीसाहेबांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती. आपल्या येथे श्री खंडेरायाचे मंदिर असावे असा विचार त्यांच्या मनात आला. ज्यावेळी त्या जेजुरीला श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या त्यावेळी येताना त्यांनी श्री खंडेराया, म्हाळसा आणि बाणाई अशा तीन मूर्ती सोबत आणल्या. अक्कलकोट येथे आल्यावर मंदिर बांधून त्या मंदिरात मूर्तींची विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली.

श्री खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन. शके 1779 ( इ. सन 1857) ललित पंचमी वार बुधवार रोजी श्री खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज अवतीर्ण झाले. स्वामी महाराज इथल्या मंदिरातील मूर्तींच्या मुखवट्यासोबत खेळत बसले. आजही त्या मूर्तींचे दर्शन आपणास समाधी मंदिरात घेता येते. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रकट झाल्यावर प्रथम लीला. श्री खंडोबा मंदिर येथे प्रकट झाल्यावर आजपर्यंत अगणित लीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवल्या त्या पैकी सर्वात प्रथम लीला महाराजांनी ह्याच मंदिराच्या ओट्यावर बसून दाखवली. स्वामी समर्थ महाराजांची चेष्टा करणाऱ्या फकिराला स्वामींनी रिकाम्या चिलमीतून अग्नी आणि धूर काढून अद्भुत लीला दाखवली.

श्री खंडोबा मंदिरात साजरे होणारे उत्सव Akkalkot Swami Samarth Information

मंदिरात गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, पुण्यतिथी इत्यादी उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्राची पूर्णपणे माहिती आहे ते अक्कलकोटला गेल्यावर न विसरता येथे दर्शनासाठी जातात. पण अनेक स्वामी भक्त माहिती अभावी श्री खंडोबा मंदिरात जात नाहीत. आपण जेव्हा कधी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी जाणार असाल तर न चुकता येथे जाऊन नतमस्तक व्हावे, कारण जिथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम प्रकट झाले त्या स्थानाचे महत्त्व खूप मोठे आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ (चोळाप्पा महाराज यांचे घर) Shri Swami Samarth Samadhi Math ( Cholappa Maharaj House)

Shree Swami Samarth Samadhi Math
Shree Swami Samarth Samadhi Math । श्री स्वामी समर्थ समाधी मठ ( चोळाप्पा महाराज वाडा )

स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज ह्यांचे घर येथे स्वामी समर्थ महाराजांनी जवळपास 21 वर्षे वास्तव्य केले. त्यानंतर महाराजांनी येथेच समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पा ह्यांच्या वाड्यातील गाभाऱ्यात डाव्या बाजूला आम्रकोटेश्वर शिवलिंग वरच्या बाजूला श्री खंडोबा आणि म्हाळसा व बाणाई ह्यांच्या मूर्तीची स्वतः स्थापना केली. सोबत उजव्या सोंडेच्या मयुरेश्वर गणपतीची देखील स्थपना केली. मुख्य स्वामींची समाधी वरती अलंकार केलेले आहेत. त्याखाली एक तळघर आहे. त्या तळघराखाली देखील अजूनही स्वामींचा देह आहे. अक्कलकोट मध्ये स्वामींचे वास्तव्य असताना गावातील वटवृक्ष मंदिराजवळील वटवृक्षाखाली स्वामी दुपारी बसायचे. संध्याकाळी स्वामींचा मुक्काम चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात असायचा. Akkalkot Swami Samarth Information

श्री स्वामी समर्थांनी चोळाप्पा महाराज ह्यांना आशीर्वाद दिलेला होता. तुझे आणि माझे सप्तजन्माचे ऋणानुबंध आहेत. तर तुझ्या घरी मी तुझ्या साथीला येथे बसून राहणार आहे. आजही येथे चोळाप्पा ह्यांचा वंशजांची परंपरा सुरू आहे. पहाटेची आरती, दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेजारती चोळाप्पा परिवाराकडून होत असते. सध्या चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज स्वामी सेवेची परंपरा अखंडितपणे चालवत आहे. स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पा ह्यांना दिलेल्या पादुका आजही येथे पाहायला मिळतात. समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, रुद्राक्ष माळ, स्वामींचा अंगरखा ह्यांचे दर्शन घेता येते. त्याच्या बाजूलाच स्वामींचे शेजघर आहे येथे स्वामींचा पलंग आजही पाहायला मिळतो. Akkalkot Swami Samarth Information

श्री गुरू मंदिर (बाळाप्पा महाराज मठ) Shri Guru Mandir ( Balappa Maharaj Math)

बाळाप्पा महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळाप्पा ह्यांची समाधी आहे. स्वामींनी बाळाप्पा ह्यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले ह्यालाच बाळाप्पा मठ आणि गुरुमंदिर असे सुद्धा म्हणतात. गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. तसेच गाभाऱ्यात छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिथेच स्वामींनी बाळाप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका देखील आहेत. ह्याच पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. मठाच्या स्थापनेचे 124 वे वर्ष सुरू आहे.

Guru Mandir (Balappa Maharaj Math)
Guru Mandir (Balappa Maharaj Math) । गुरु मंदिर ( बाळाप्पा महाराज मठ )

उजव्या बाजूला श्रीमद सद्गुरू गंगाधर महाराज ह्यांची समाधी आहे. बाळाप्पा महाराज ह्यांच्यानंतर गंगाधर महाराज गादीवर आले. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे ह्यांची समाधी आहे. गजानन महाराज हे गंगाधर महाराजांच्या नंतर गादीवर आले. येथील अखंडित गुरुशिष्य परंपरेमुळे ह्याला गुरुमंदिर असे सुद्धा म्हणतात. 25 नोव्हेंबर 2017 रोजी मठाच्या छताचे नूतनीकरण केल्यानंतर मठाच्या जुन्या फरश्या बदलून ग्रॅनाईट फरश्या बसवणार होते. पण ज्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार होती त्या दिवशी जागोजागी स्वामींची पाऊले फरशीवर दिसली. आजही ती पावले येथे पहावयास मिळतात त्याला मार्किंग केलेले आहे. बाळाप्पा मठातील उजव्या बाजूला गंगाधर महाराज ह्यांच्या समाधी बाजूला श्री स्वामी समर्थांचा मूळ फोटो लावलेला आहे. सदरील फोटो अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने 1872 साली काढलेला आहे. स्वामी समर्थ महाराज हयात असताना सर्व शिष्यगणां सोबत कॅमेरा मधून काढलेला भारतातील हा पहिला फोटो आहे. येथे अन्नछत्र सुद्धा आहे. ह्या अन्नछत्रामध्ये पंगत वाढण्याची सेवा सुध्दा स्वामी भक्तांना करता येते. बाळाप्पा स्वामी महाराजांच्या सेवेत प्रत्यक्ष 22 वर्षे होते. Akkalkot Swami Samarth Information

श्री हक्क्याचे मारुती मंदिर ( बाळाप्पा महाराजांची तपोभूमी) Sri Hakyache Maruti Mandir

समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली ह्या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील मारुती रायाची मूर्ती दक्षिणमुखी असून मूर्तीचा चेहरा हा मानवरूपी आहे. स्वामी महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकातले इस्टेटीसाठी त्यांच्या भाऊ बांधवांनी विषप्रयोग केला. त्या वेळेस ते अक्कलकोटी आले असता श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी बारा वर्षे तप केले ते ह्याच मंदिरात! याच मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या व खडावा ठेवलेल्या आहेत.अक्कलकोट मध्ये येणाऱ्या ज्या भाविकांना ह्या पवित्र स्थानाची माहिती आहे ते येथे जाऊन आवश्यक दर्शन घेतात पण जे माहिती अभावी जात नाहीत त्यांनी इथे आवश्यक जावे. हे स्थान स्वामी महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराज ह्यांची तपोभूमी असल्यामुळे ह्याचा महिमा तितकाच मोठा आहे. Akkalkot Swami Samarth Information

श्री स्वामी समर्थ राजेराय मठ Shri Swami Samarth Rajerai Math

Shree Swami Samarth Rajerai Math Akkalkot
श्री स्वामी समर्थ राजेराय मठ । Shree Swami Samarth Rajerai Math Akkalkot

इ.स 1877 मध्ये शंकर रावांकडून बांधल्या गेलेल्या मठात स्वामी महाराजांच्या चैतन्य पादुका आहेत आणि परमपूज्य सदगुरू बेलानाथ बाबांचे वास्तव्यस्थान देखील येथेच होते. शंकरराव राजेरायन रायबहाद्दूर नावाच्या जहागीरदारांस ब्राम्हसंबंध व कुष्ठव्याधी आजाराने पछाडले होते. कोणत्याही औषधाने फरक न पडल्यामुळे सहकुटूंब तीर्थाटन करीत ते गाणगापूर येथे उपासना करीत होते. यावेळी श्री दत्त महाराजांनी ” मी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या रुपात आहे, तिकडे ये” असा स्वप्नी दृष्टांत दिला. या नुसार शंकरराव अक्कलकोटला आल्यावर त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची माहिती मिळाली. आपली व्याधी निरसन होण्याकरिता त्यांनी सुंदराबाई मार्फत स्वामींचा चरणी दहा सहस्त्र रुपये वाहण्याचा संकल्प केला. Akkalkot Swami Samarth Information

या अनुषंगाने अंतर्यामी श्री स्वामी समर्थ महाराजांनी फिरत फिरत एका यवनस्मशान भूमी जवळ येऊन लीला केली. व शंकररावांचे मरण चुकविलें. ह्याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 9व्या अध्यायात येतो. दहा दिवसांत व्याधी बरी झाल्याने शंकररावांनी महाराजांना विचारले व्याधी बरी झाल्यावर दहा सहस्त्र रुपये देईन असा निर्धार केला होता त्याचे काय करावे? त्यावर महाराजांनी या पैशातून मठ बांधून पादुकांची स्थापना करण्याचे आदेश दिले. आज्ञेनुसार येथे मठ बांधला गेला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांचे ठसे घेऊन पादुका बनवल्या गेल्या व स्वामींनी स्वहस्ते पादुकांची स्थपना केली. व हे माझे विश्रांती स्थान असेल असे सूचित केले. मठाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णस्वरूपी मूर्ती आहे. जोपर्यंत आपण येथे गाभाऱ्यातील दारासमोर वाकून नमस्कार करत नाही तोपर्यंत पूर्ण मूर्ती दिसत नाही. अर्थातच येथे स्पष्टपणे संदेश दिलेला आहे जोपर्यंत आपण आपला अहंकार बाजूला ठेवून स्वामींसमोर नतमस्तक होत नाही तोपर्यंत स्वामींचे दर्शन होणार नाही. अक्कलकोट येथे गेल्यावर शंकरराव राजेरायन रायबहाद्दूर मठामध्ये जाऊन स्वामींसमोर नतमस्तक व्हावे. Akkalkot Swami Samarth Information

श्री शमीविघ्नेश गणेश मंदिर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात 1990 साली जमिनीवर झाडी झुडपे साफसफाईचे काम सुरू असताना जमिनीच्या मधल्या भागात एक शमीवृक्ष आढळला. तिथले सपाटीकरण करते वेळी गणपती बाप्पाची मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली गणपती बाप्पाची स्थापना करून मंदिर व सभा मंडप बांधण्यात आला आहे. जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव्य केले त्याच भूमीवर श्री शमीविघ्नेश गणपती असल्याने त्याचे स्थान व महात्म्य फार मोठे आहे. Akkalkot Swami Samarth Information

अक्कलकोट मंदिरात करावयाची श्री स्वामी समर्थ उपासना

आपण अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेल्यावर सर्वच मंदिरात अभिषेकाची सोय आहे. जर आपल्याला शक्य असेल तर जरूर आपण अभिषेक करू शकता. वटवृक्ष मंदिर, समाधी मंदिर येथे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंतच सामूहिक अभिषेक करता येतो. पण ज्या स्वामी भक्तांना अभिषेक करणे शक्य होत नाही त्यांनी मंदिरात वयक्तिक श्री स्वामी समर्थ उपासना जरूर करावी. मनोभावे उपासना केल्यास महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आयुष्यातील अडचणी, दुःखे व इतर समस्या दूर होऊन आयुष्य आनंदी होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. आता सहाजिकच आपल्याला प्रश्न पडला असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना कशाप्रकारे करावी ?
चला तर मग जाणून घेऊया… Akkalkot Swami Samarth Information

श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण

अक्कलकोट मंदिरात गेल्यावर आपण वटवृक्ष मंदिर किंवा समाधी मंदिर येथे बसून मनोभावे श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे पारायण करावे. आपण ३ अध्याय , ७ अध्याय, संपूर्ण २१ अध्याय असे पारायण करू शकता. २१ अध्यायाचे पारायण केल्यास अतिउत्तम! संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करण्यासाठी साधारण २ तास एवढा कालावधी लागतो. आपल्याकडे पोथी असेल तर जाताना सोबत आपली पोथी घेऊन जावी. ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांना मंदिर परिसरातील स्टॉल वरती सहज उपलब्ध होऊ शकेल.

श्री स्वामी समर्थ ह्या दिव्य मंत्राचा जप

श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाच्या परायणा सोबत ” श्री स्वामी समर्थ ” ह्या दिव्य मंत्राच्या ३, ७, ११, २१ माळा जप करावा. वेळेअभावी पारायण करणे शक्य नसल्यास स्वामी समर्थ मंत्राचा जप जरूर करावा.

अक्कलकोट भक्तनिवास Akkalkot Bhakta Niwas

अक्कलकोट येथे गेल्यावर स्वामी भक्तांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे, अक्कलकोट मध्ये राहण्याची सोय. त्या अनुषंगाने अक्कलकोट मधील भक्तनिवास अनुक्रमे खालील प्रमाणे
यात्री भुवन अक्कलकोट भक्तनिवास । Yatri Bhuvan Akkalkot Bhakta Niwas
यात्री भुवन अक्कलकोट हा भक्त निवास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत चालविण्यात येतो. अक्कलकोट येथे येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत माफक दरात येथे रूम उपलब्ध असतात. अन्नछत्र मंडळाच्या परिसरात श्री शमीविघ्नेश गणपती मंदिराच्या समोरील बाजूस यात्री भुवन भक्तनिवास इमारत आहेत.
यात्री भुवन अक्कलकोट रूम । Yatri Bhuvan Akkalkot Room
यात्री भुवन अक्कलकोट येथे एकूण 106 रूम असून त्यापैकी 18 AC रूम आहेत.

Akkalkot Swami Samarth Information

Yatri bhuvan Akkalkot Bhakta niwas
Yatri bhuvan Akkalkot Bhakta niwas | यात्री भुवन अक्कलकोट भक्त निवास

सर्व रूम एकदम स्वच्छ असून येथे पार्किंग, सेक्युरिटी, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. यात्री भुवन अक्कलकोट भक्तनिवास ऑनलाईन बुकिंग । Yatri Bhuvan Akkalkot Bhakta Niwas Online Booking यात्री भुवन अक्कलकोट येथे कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन वेबसाईटद्वारे बुकिंग घेतले जात नाही असे आव्हान अन्नछत्र मंडळाद्वारे करण्यात आलेले आहे. येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर रूम दिल्या जातात ह्याची सर्व स्वामीभक्तांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही ऑनलाईन फसवेगिरीला बळी पडू नये ही विनंती.

यात्री भुवन फोन नंबर आणि वेबसाईट । Yatri Bhuvan Phone Number and Official Website

Phone Number02181-222587
Mobile Number9067670587
Websiteswamiannacchatra.org
Akkalkot Bhakta Niwas Phone Number | Official Website

अपेक्षा करतो श्री क्षेत्र अक्कलकोट संपूर्ण माहिती अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना उपयोगी पडेल.आपण जर अक्कलकोटला जाऊन आला असाल तर आपला अनुभव आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ!

Akkalkot Swami Samarth Information

Shree Swami Samarth Tarak Mantra Lyrics In Marathi

Blog